Friday, 6 November 2026

कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

 कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘एसआरए‘ला निर्देश

  • चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा

मुंबई, दि. ५ : कुर्ला-ट्रॉम्बे परिसरात वर्षानुवर्षांपासून रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. 

वेगवेगळ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीस माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, सुजात आंबेडकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, एमएमआरडीए, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीने बैठकीस उपस्थित होते.

यावेळी कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील चिखलवाडी, आरसीएफ-प्रियदर्शनी ते माहुलपर्यंत रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, एकूणच परिस्थितीची माहिती देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्याने अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या झोपडीपट्टीधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी एसआरएने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi