हिंगोली, पेठ व जांबुटके आणि नाशिक पेठ येथे एमआयडीसी स्थापन
करण्याबाबत शासन सकारात्मक
- उच्चाधिकार समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश
मुंबई, दि. ५ : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ व जांबुटके येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
हिंगोली जिल्ह्यात सध्या चार औद्योगिक क्षेत्रे कार्यान्वित असून, औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी अतिरिक्त हिंगोली टप्पा-१, टप्पा-२ आणि हिंगोली एमएसएमई पार्क अशा तीन नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाची कार्यवाही सुरू आहे. लायगो प्रकल्पाला बाधा न येता पर्यायी शासकीय जमिनीवर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे पर्यायही तपासण्यात येत आहेत.
हिंगोलीतील लिंबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ७० उद्योगघटक कार्यरत असून, त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या उद्योगांमधून सुमारे ९०० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे, एस. आर. बर्गे, खाजगी सचिव सतिश जाधव, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment