कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला. त्यामुळे हवामानाचा ताण सहन करणारी आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन आणि त्याच्या उपयोजनाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
शेतीसोबतच पशुपालन हा शेतक-यांसाठी महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्वाचे आहे. देशी गाई केवळ दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेले हे दोन्ही शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. रामटेकच्या विकासासाठी या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार समीर मेघे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment