Friday, 16 October 2026

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावे -सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांना आवाहन mahanatyaspardha.com

 राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेmahanatyaspardha.com

-सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांना आवाहन

 

            मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुकांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे.

 

            सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी मराठी, हौशी हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, मराठी एकांकिका तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसह विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

 

            या स्पर्धांमधील नाटकांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धक कलाकार व नाट्यसंस्थांना मिळवून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यानुसार यंदा परीक्षणासाठी इच्छुक कलाकारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

            सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

अर्ज कुठे करावा?

 

            परीक्षणासाठी इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहितीसाठी याच संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

            नाट्य क्षेत्रातील पात्र व अनुभवी कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi