Monday, 5 October 2026

कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या परिसरातील संरक्षण भिंतीचे सुशोभीकरण तसेच परिसराच्या विकासकामांमुळे हा भाग अधिक सुरक्षित, संरक्षित

 कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या परिसरातील संरक्षण भिंतीचे सुशोभीकरण तसेच परिसराच्या विकासकामांमुळे हा भाग अधिक सुरक्षित, संरक्षित


आणि सुशोभित झाला आहे, असे प्रतिपादन कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

पश्चिम द्रुतगती महामार्गालगत, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेसमोरील परिसरात आमदार विकास निधीतून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार अतुल भातखळकर बोलत होते. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, “या ठिकाणी पूर्वी साधा रस्तादेखील उपलब्ध नव्हता. सर्वप्रथम या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण भिंत उभारण्याचे काम करण्यात आले. आज याच रिटेनिंग वॉलचे सुशोभीकरण पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.”


आकुर्ली भुयारी मार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर त्याचेही सुशोभीकरण करण्यात आले. रस्ते, संरक्षणात्मक भिंती आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासोबतच परिसराचे सौंदर्यीकरण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराला सुरक्षिततेसोबतच आकर्षक आणि सुबक स्वरूप प्राप्त झाले आहे, असेही आमदार भातखळकर यांनी सांगितले.

“विकासकामे केवळ सुविधा निर्माण करण्यापुरती मर्यादित न ठेवता त्यातून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर परिसर मिळावा, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,” असे आमदार भातखळकर यांनी नमूद केले.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बाळा तावडे उपस्थित होते “अत्यंत लोकोपयोगी कामे कल्पकतेने करण्यामध्ये आमदार अतुल भातखळकर यांचा हातखंडा आहे,” असे गौरवोद्गार या वेळी त्यांनी काढले. या व्यतिरिक्त कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातील उपस्थित नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांचा आणि नागरिकांसाठी राबविलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. या विकासकामांमुळे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होत असून, नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi