महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि संगीत परंपरेचा राष्ट्रीय गौरव
· शास्त्रीय गायनापासून भारूड, शाहिरी, पोवाडा आणि बाहुलीनाट्य या कला प्रकारात सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’
नवी दिल्ली, दि. १९ : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील विविध कलापरंपरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, राज्यातील सहा युवा कलावंतांना संगीत नाटक अकादमीच्या प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापासून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडलेल्या भारूड, शाहिरी, पोवाडा आणि पारंपरिक बाहुलीनाट्यापर्यंत विविध कलाप्रकारांत योगदान देणाऱ्या या कलावंतांच्या सन्मानामुळे राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे.
केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्लीतील रवींद्र भवन परिसरातील मेघदूत थिएटर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या समारंभात २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी देशभरातील एकूण १०६ युवा कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’अंतर्गत २५ हजार रुपये रोख, ताम्रपट आणि अंगवस्त्र देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात येतो. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणे, पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करणे आणि भारतीय कला-संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे
No comments:
Post a Comment