शेवटच्या घटकापर्यंत योजनांची पोहोच हेच सुशासन : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
- अंत्योदयाच्या तत्त्वावर शेवटच्या व्यक्तीचे सक्षमीकरण आवश्यक
मुंबई, दि. ३० : ‘विकसित भारत २०४७’ ही केवळ आर्थिक प्रगतीची संकल्पना नसून समृद्ध, सक्षम, सर्वसमावेशक, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आपल्या सभ्यता-संस्कृतीचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारताची दृष्टी आहे. सरकारी निर्णय, योजना आणि सेवांची प्रभावी पोहोच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत होणे, तसेच त्याचे सक्षमीकरण होणे, हाच सुशासनाचा गाभा असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
पांचजन्यतर्फे मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे आयोजित ‘सुशासन संवाद – मुंबई संकल्प’ कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी भारत प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार गोयल, पांचजन्यचे संपादक हितेश शंकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर विकसित भारत २०४७ हे प्रेरणादायी उद्दिष्ट ठेवले आहे. या संकल्पनेचा केंद्रबिंदू शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचविणे हा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘अंत्योदय’ तत्वज्ञानातही याच विचाराचे प्रतिबिंब दिसते. समाजातील अंतिम घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, त्याला ताकद द्यावी आणि त्याचे जीवनमान उंचवावे, यालाच खऱ्या अर्थाने सुशासन म्हणता येईल.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा सर्वसमावेशक विकासाचा मंत्र आहे, असे नमूद करून राज्यपालांनी ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय विचारपरंपरेचा संदर्भ दिला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणे, शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून विकासासाठी काम करणे, ही भारतीय लोकशाहीची मूलभूत दिशा असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment