Tuesday, 20 October 2026

अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

 अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

दुष्काळामुळे अन्नधान्य, पाणी आणि इंधनाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंगणवाडी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बालकांना गरम ताजा आहार, घरपोच आहार (टीएचआर) आणि अमृत आहार वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. जिल्हास्तरीय आहारपुरवठा समित्यांना अन्नधान्याचा साठा, पाण्याची उपलब्धता आणि इंधनाची स्थिती यांचा आढावा घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर टंचाई निर्माण झाल्यास लाभार्थ्यांच्या आहारपुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी आवश्यकतेनुसार आहाराच्या मेनूमध्ये तात्पुरते बदल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये आहार शिजविण्यासाठी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये अंगणवाडी केंद्रांना प्राधान्याने पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा समित्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. गरम ताजा आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटांनाही आवश्यक पाणी आणि इंधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन केले जात आहे. दुष्काळामुळे मूलभूत सुविधांवर ताण निर्माण झाला, तरी बालकांच्या आहारात व्यत्यय येऊ नये, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi