बीडमध्ये कपाशी, ऊस ,सोयाबीनची पाहणी
जालना जिल्ह्यातील पाहणीनंतर केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. या वेळी आमदार विजयसिंह पंडित, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा परिसरातील पाहणीनंतर अर्धमसला आणि रानमळा परिसरातील पिकांची स्थिती जाणून घेण्यात आली. अर्धमसला येथील शेतकरी सुरेश बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ९४ मधील १.४० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची, तर संतोष बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ३३१ मधील ०.६७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाची पाहणी करण्यात आली. गेवराई येथील मदन रामभाऊ मोटे यांच्या ०.८० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचीही माहिती घेण्यात आली.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशी, ऊस आणि तुती पिकांवर परिणाम झाला आहे. तुतीची वाढ खुंटल्याने अपेक्षित उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून करपलेल्या पिकांचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मदन रामभाऊ मोटे यांच्या तूर आणि कपाशी पिकांची पाहणी करताना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली. विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही ऊस पीक जळून गेल्याचे सांगितले
No comments:
Post a Comment