गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण!
· नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची मंगलमय नांदी
· वैदिक मंत्रांचा घोष, शंखनादाचा निनाद अन् गोदावरीच्या साक्षीने अवतरले श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे वैभव!
नाशिक, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : गोदावरीचा पावन तीर… वैदिक मंत्रांचा मंगलघोष… शंखनादाने दुमदुमलेला आसमंत… भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण! जणू हजारो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेने आज नाशिक येथील रामतीर्थावर पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले. गोदामाईच्या साक्षीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला. वैदिक ऋचांच्या पवित्र स्वरांत, साधू-संतांच्या सान्निध्यात आणि गोदावरीच्या अखंड प्रवाहाच्या साक्षीने साकारलेल्या या अलौकिक क्षणाने अवघी नाशिकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महापर्वाची चाहूल देणारा हा सोहळा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.
गोदावरीच्या लाटालाटांत जणू मंगलस्वर उमटत होते… मंदिरांच्या पावन परिसरात भक्तीचा सुगंध दरवळत होता… अन् रामतीर्थावर उपस्थित प्रत्येकाच्या अंतःकरणात सिंहस्थाच्या स्वागताची अनामिक ओढ दाटून आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेले धर्मध्वजारोहण हे केवळ एका धार्मिक विधीचे आयोजन नव्हते; तो भारतीय संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचा, संतपरंपरेच्या चिरंतन वारशाचा आणि कोट्यवधी भाविकांच्या अढळ श्रद्धेचा मंगलमय आविष्कार होता. धर्मध्वजा आकाशात डौलाने फडकताच शंखनादाचा निनाद दशदिशांत घुमला. त्या क्षणी जणू गोदातीरावरील प्राचीन श्रद्धेला नव्या युगातील सिंहस्थाच्या स्वागताचे पवित्र अधिष्ठान लाभले.
या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे खासदार डाॅ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.
धर्मध्वजारोहणाच्या पवित्र विधींनी सिंहस्थाच्या आगमनाला धार्मिक परंपरेचे अधिष्ठान
भारतीय धार्मिक परंपरेचे पावित्र्य आणि वैदिक संस्कृतीचे मांगल्य जपत या सोहळ्यातील प्रत्येक विधी अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली. यज्ञकुंडातील पवित्र अग्निज्वाला आणि वैदिक मंत्रोच्चारांनी वातावरणात मंगलमय चेतना निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रपतींनी जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करून धर्मध्वजेला वंदन केले. पुरोहितांच्या मंत्रघोषात त्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा परममंगल क्षण साकारला. धर्मध्वजा आकाशात फडकताच शंखनादाने रामतीर्थाचा आसमंत दुमदुमला. मंगलवाद्यांच्या निनादात मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यज्ञाहुती, गोदापूजन, ध्वजपूजन आणि धर्मध्वजारोहणाच्या पवित्र विधींनी सिंहस्थाच्या आगमनाला धार्मिक परंपरेचे अधिष्ठान लाभले. गोदावरीच्या तीरावर फडकलेली धर्मध्वजा जणू देश-विदेशातील भाविकांना या श्रद्धामहोत्सवाचे मंगलमय निमंत्रण देत होती.
या पवित्र सोहळ्याला विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य आणि साधू-संतांच्या उपस्थितीने विलक्षण आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. जगद्गुरू
No comments:
Post a Comment