Tuesday, 20 October 2026

आमदार अतुल भातखळकर यांच्या पुढाकारातून नवरात्र उत्सवात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹८३ लाखांची मदत;

 आमदार अतुल भातखळकर यांच्या पुढाकारातून नवरात्र उत्सवात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹८३ लाखांची मदत;


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले दात्यांचे आभार!

कांदिवली पूर्व, मुंबई 20 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹८३ लाखांचे योगदान देण्यात आले. आमदार अतुल भातखळकर यांच्या पुढाकारातून आकुर्ली सेवा फाउंडेशन आयोजित ‘रमझट नवरात्रोत्सव २०२६’ निमित्त अशोकनगर येथील लाल माटी मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यसम्राट आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. यापुढेही जनतेच्या हितासाठी होणाऱ्या विकासकामांना राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य राहील.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली भुयारी मार्गाचे रुंदीकरण तसेच मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड खुला करण्यासारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील अनेक विकासप्रकल्पांना गती मिळाली आहे.
महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण संकट असताना या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले. या सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹८३ लाखांचे योगदान देण्यात आले. यापुढेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अधिकाधिक योगदान देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.
यावेळी गरबा मंडपात ‘ड्रग्जमुक्त मुंबई’चा संदेश देणारे प्रतीकात्मक दहीहंडी प्रदर्शनही करण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार योगेश सागर, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi