Tuesday, 27 October 2026

तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य

 तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना

महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• जलसंपदा प्रकल्पाच्या परिणामांच्या स्वतंत्र अभ्यासासाठी संयुक्त समिती

           

            मुंबई, दि. २६ - तेलंगणा राज्यातील थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या विनंतीनुसार या प्रकल्पविषयक मुद्द्यांचा महाराष्ट्र स्वतंत्र अभ्यास करेल. यासाठी दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागांचे सचिव यांची संयुक्त समिती नेमून तांत्रिक मुद्दे आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्र यांचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करत तेलंगणाला सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तेलंगणा चे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी तसेच जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी थुमिडीहेट्टी प्रकल्पाविषयी माहिती देऊन प्रकल्पाची उंची १४८ वरून १५२ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेजारी राज्यांचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्याची भूमिका महाराष्ट्राने नेहमीच घेतली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे नुकसान होत नसेल आणि अन्य राज्याला लाभ होत असेल, तर सकारात्मक निर्णय घेण्यास राज्याची हरकत नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने तेलंगणाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पूर्वीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावामुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi