बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करण्यावर भर
-खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे
· संस्थांच्या प्रश्नांवर पुण्यात राज्यस्तरीय बैठक
मुंबई, दि.३० : राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करणे, त्यांच्या समस्या सोडविणे आणि कारागिरांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे येथे महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सभापती रवींद्र साठे म्हणाले, की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यात बलुतेदार सहकारी संस्था या मंडळाचा कणा असून, त्या मंडळाचा अविभाज्य भाग आहेत. संस्थांनी आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करावे.
माजी विधान परिषद सभापती वि. स. पागे यांच्या पुढाकारातून कारागीर रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यात १९७२ पासून तालुका आणि ग्रामीण स्तरावर बलुतेदार सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या संस्थांचे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी मंडळाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील सर्व बलुतेदार सहकारी संस्थांची परिपूर्ण माहिती मंडळाकडे सादर करावी. तसेच संस्थांची सद्यःस्थिती, अडचणी आणि आवश्यक सहकार्य याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले.
No comments:
Post a Comment