दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम;
प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल तातडीने सादर करा
-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २३ : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’ मध्ये मोडणाऱ्या तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय व संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी, तसेच मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणावी, असेही त्यांनी सांगितले.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली.
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर होणारा परिणाम लक्षात घेता, संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून दुष्काळाची तीव्रता तसेच मासेमारी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती संकलित करावी. मत्स्य तलाव आणि संबंधित जलस्रोतांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे नोंदवून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिले.
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी विभागाने तत्परतेने कार्यवाही करावी. मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याबाबतची माहिती अचूकपणे संकलित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
No comments:
Post a Comment