गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार
- पणन मंत्री जयकुमार रावल
· महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार हा केवळ औद्योगिक गुंतवणुकीचा करार नसून गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या महत्वाकांक्षी संकल्पाचा पाया असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
या करारासंदर्भात आयोजित बैठकीत जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ. फ्रेडरिक मार्टिन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे आदी उपस्थित होते.
यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देणारे अव्वल राज्य आहे. राज्याचा विकास हा केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक विकासावर आधारित आहे. गडचिरोलीतील हा उपक्रम केवळ नवीन उद्योग उभारण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या औद्योगिक परिवर्तनाचा पाया ठरेल. या प्रकल्पामुळे अत्याधुनिक हरित तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्थानिक युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. विदर्भातील नैसर्गिक व खनिज संपत्तीला पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियेची जोड देत जबाबदार औद्योगिक विकासाचे आदर्श मॉडेल उभारले जाईल.
No comments:
Post a Comment