शासनाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना बाजारपेठेची मागणी आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांची जोड देण्यासाठी या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कृषी-व्यवसाय, अन्नप्रक्रिया, बँकिंग, वित्त, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा विकास आणि स्टार्टअप क्षेत्रातील सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या चर्चांमधून राज्यातील संभाव्य कृषी क्लस्टर्स, गुंतवणुकीच्या संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व अभिप्राय प्राप्त होणार असल्याचे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. या मेळाव्यातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांच्या आधारे प्राधान्य कृषी क्लस्टर्स, मूल्यसाखळ्या, पायाभूत सुविधा आणि अपेक्षित गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर खासगी क्षेत्राचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मॅग्नेट २.० च्या माध्यमातून महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता प्रक्रिया, मूल्यवर्धन, आधुनिक साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि निर्यातक्षम कृषी-व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील आहे. या गुंतवणूकदार मेळाव्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी आणि शेतमालाला अधिक मूल्य मिळण्याच्या प्रक्रियेला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment