एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ९ - डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अधोरेखित केली. '
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गतवर्षी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये महाराष्ट्राला देशातील पहिले ‘टोकनाइज्ड स्टेट’ बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला होता. त्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट ॲक्ट (डेल्टा ॲक्ट)’ ची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कायद्याद्वारे जमीन आणि स्थावर मालमत्तेच्या ब्लॉकचेन-आधारित टोकनायझेशनसाठी आवश्यक कायदेशीर चौकट निर्माण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सेबी, बीएसई, एनएसई, उद्योग, तंत्रज्ञान, कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. टोकनायझेशन ही स्थावर मालमत्तेमध्ये अडकलेले भांडवल उत्पादक आर्थिक संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठीची प्रक्रिया आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल, तरलता निर्माण होईल आणि निष्क्रिय संपत्ती आर्थिक विकासासाठी उपयोगात आणता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment