सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी
व्यापक आराखडा तयार करावा
-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
नाशिक, दि. १६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक व प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.
महासंचालक सिंह यांच्या उपस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान, वृत्तचित्र विभागाचे वरिष्ठ सहायक संचालक सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.
महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षानंतर कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य माध्यमे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करावा. त्यासाठी व्यापक आणि सर्वंकष असा आराखडा तयार करावा.
या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात यावी.
No comments:
Post a Comment