Saturday, 5 September 2026

मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी

 मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपातील सुमारे दोन अब्ज लोकसंख्या, जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आणि विशाल बाजारपेठ परस्परांशी जोडली जाणार आहे. हा करार शेतकरी, मच्छीमार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप, महिला उद्योजक, उत्पादक आणि सेवा क्षेत्रासाठी व्यापक संधी निर्माण करणारा आहे. दोन्ही बाजूंच्या संवेदनशील क्षेत्रांचे हित जपत हा परस्पर लाभाचा करार करण्यात आला आहे.

 

युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सागरी बंदर असलेले अँटवर्प-ब्रुज भारतीय निर्यातदारांसाठी युरोपच्या औद्योगिक आणि ग्राहक बाजारपेठेचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरेल. बंदराची जलमार्ग, रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था भारतीय उद्योगांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

 

हिरे व दागिने, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन व बंदरे, संरक्षण व प्रगत उत्पादन तसेच कृषी व अन्नप्रक्रिया या क्षेत्रांमध्ये भारत आणि बेल्जियमच्या क्षमता परस्परपूरक आहेत. बेल्जियमचे तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भांडवल यांना भारताचे कौशल्य, प्रतिभा, युवा लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ यांची जोड मिळाल्यास ही भागीदारी जागतिक स्तरावर यशस्वी होईल. कौशल्य विकास, शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता, संयुक्त पदवी अभ्यासक्रम आणि मनुष्यबळ गतिशीलतेवरही दोन्ही देशांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी बेल्जियमचे मुंबईतील महावाणिज्यदूत फ्रॅंक ग्रीकेन्स, अँटवर्प-ब्रुज बंदराचे ग्लोबल पार्टनरशिप डायरेक्टर टॉम मोनबॉलिऊ, मुख्य ग्राहक संपर्क अधिकारी विलियम डेमोर, फ्लँडर्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीएट डेमुंटर यांच्यासह भारत आणि बेल्जियममधील उद्योग, व्यापार, बंदर, गुंतवणूक आणि शासकीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi