शून्य ते दोन वर्षे वयोगटावर विशेष लक्ष
बालकांची सर्वाधिक शारीरिक आणि बौद्धिक वाढ शून्य ते दोन वर्षे या कालावधीत होत असल्याने या वयोगटासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा. कुपोषण, अॅनिमिया, जन्मजात आजार यांचे लवकर निदान करून आवश्यक उपचार तत्काळ सुरू करावेत. पोषण पुनर्वसन केंद्रांशी समन्वय साधून उपचारासाठी निश्चित केलेल्या प्रत्येक बालकाचा पाठपुरावा करण्यात यावा.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणीमध्ये आढळून आलेल्या बालकांवर शंभर टक्के उपचार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची नियोजित वेळेत आरोग्य तपासणी पूर्ण करावी. अंगणवाडी आणि शाळांमधील तपासणीची माहिती डिजिटल प्रणालीवर नोंदवून उपचार पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बालकाचा मागोवा घ्यावा.
प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सेवा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, याबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करावी. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, वृद्धापकाळाशी संबंधित आजार आणि संसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी नियमित शिबिरे आयोजित करावीत.
No comments:
Post a Comment