वर्धा येथे राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व
संवर्धन केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. ९ : कडुनिंब हे भारतीय परंपरेतील अत्यंत उपयुक्त औषधी आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वृक्ष आहे. कडुनिंब संशोधन व संवर्धन, जैवविविधतेचे जतन, कृषिवानिकी, प्रशिक्षण व जनजागृतीसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील भिडी येथे राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
वर्धा जिल्ह्यातील भिडी येथील शासकीय रोपवाटिकेत राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री गणेश नाईक बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाणे, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कडुनिंबाचे संशोधन व संवर्धन, जैवविविधतेचे जतन, कृषिवानिकीचा प्रसार, प्रशिक्षण आणि जनजागृतीला चालना मिळेल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल.
कडुनिंब प्रजातीसंदर्भात यापूर्वी झालेल्या संशोधनाची माहिती तसेच सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या व्याप्तीबाबत संशोधन विभागाने सविस्तर अहवाल सादर करावा. या केंद्रासाठी आवश्यक जमीन आणि निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही तातडीने करावी, अशा सूचना वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी दिल्या
No comments:
Post a Comment