Saturday, 12 September 2026

टीबीमुक्त मुंबईसाठी जनजागृतीला गती देण्याचे राज्यपालांचे आवाहन

 टीबीमुक्त मुंबईसाठी जनजागृतीला गती देण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई, दि. ११ : मुंबई महानगर आणि परिसराची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असून लोकसंख्येची घनता मोठी असल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती, वेळेवर निदान आणि पूर्ण उपचार अत्यंत महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

राज्यपाल देव वर्मा यांच्या पुढाकाराने तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून टीबी मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यपालांच्या उपस्थितीत अन्सारी नगर कुर्ला येथील अण्णा लीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाविद्यालयाच्या १२०० विद्यार्थ्यांनी या जनजागृती फेरी सहभाग घेतला.

राज्यपालांच्या हस्ते टीबी मुक्त भारत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना क्षयरोग जनजागृतीची प्रतिज्ञा देण्यात आली.

टीबी मुक्त मुंबई अभियान जनजागृती फेरीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे, बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रसाद कारंडे, अण्णा लीला महाविद्यालयाचे प्राचार्य हिरेन दंड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

टीबी हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक आणि आर्थिक आव्हानदेखील आहे. आजच्या प्रगत वैद्यकीय विज्ञानामुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजाराचे वेळेवर निदान होऊन रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे आणि पूर्ण उपचार घेतल्यास तो पूर्णपणे निरोगी होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi