*महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका 25 सप्टेंबर पर्यंत सादर करावी*
पालघर, दि.२ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेला नवी ऊर्जा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे बिगुल वाजले असून, विविध नाट्य संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक नाट्य संस्थांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागांतील हौशी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नाट्य संस्थांना आपली कलात्मकता सादर करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
यंदाच्या २३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून राज्यातील विविध १० केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६५ व्या हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर २०२६ पासून घेण्यात येणार आहे.
ऑनलाइन प्रवेशिका; कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि स्पर्धेचे नियम mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिका २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसतील किंवा प्रवेशिकेतील आवश्यक तपशील पूर्ण भरलेला नसेल, तर ऑनलाइन प्रवेशिका सादर करता येणार नाही.
प्रयोगासाठी शासनाचे नियम बंधनकारक
स्पर्धेसाठी एखाद्या संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि निर्धारित तारखेला संस्थेने नाट्यप्रयोग सादर केला नाही, तर प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. तसेच स्पर्धेसाठी शासनाने निश्चित केलेले सर्व नियम संबंधित संस्थांना बंधनकारक राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात येईल.
राज्यातील अधिकाधिक नाट्य संस्थांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेला समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment