नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश
· राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्स्, खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास तसेच रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कठोर मेहनत, समर्पण आणि त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने ही पारितोषिक योजना सुधारीत करण्यात आली आहे. यात आता केंद्र शासन आणि इतर क्रीडा-प्रगत राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख (पूर्वी ५ लाख), रौप्यसाठी पाच लाख (पूर्वी ३ लाख) तर कांस्यसाठी तीन लाख (पूर्वी दीड लाख) अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रम ७ लाख,५ लाख, ३ लाख रुपये आणि खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रम ३ लाख,२ लाख,१लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी २२.५० वरून ५० लाख, रौप्यसाठी १५ वरून ३० लाख तर कांस्य पदासाठी ७.५ वरून २० लाख अशी वाढ करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment