Tuesday, 25 August 2026

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देऊन प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा

  

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देऊन

प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा

 - उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

 

            मुंबई, दि. २५ : जळगाव जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रांमधील प्रलंबित प्रश्न, भूसंपादन, पायाभूत सुविधा तसेच नवीन प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती द्यावी, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

 

            मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सर्वश्री सुरेश भोळे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल चव्हाण, अमोल महाडिक यांच्यासह संबंधित भागातील लोकप्रतिनिधी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ .पी अन्बळगन, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

            जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करावा, अशा सूचना मंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या. या धोरणामुळे जिल्ह्यातील उद्योगांना विविध सवलती व प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. चिंचोली आणि कुसुंबा एमआयडीसीच्या विस्ताराला गती देण्याबरोबर सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा, मूल्यांकनाचा आणि दर निश्चिती करावी, अशा सूचना करत, कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तसेच उद्योजकांनाही परवडेल, अशा समन्वयातून भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश मंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi