तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य
जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार
मुंबई, दि. 26 : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्तक्षय हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०१५ मध्ये आरोग्य विभागाला आयर्न सुक्रोजच्या माध्यमातून ॲनिमियावरील उपचार राबविण्याचे निर्देश दिले होते. यामुळे राज्यातील गरोदर मातांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात विभागाने तीव्र रक्तक्षयावरील मोफत उपचारांना गती दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आयर्न सुक्रोजचा सिद्ध आणि परिणामकारक उपचार पोहोचविण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरोदर मातांनाही तीव्र रक्तक्षय विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यरत आहे. तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना वेळेत उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे सुरक्षित मातृत्वाचा पाया अधिक भक्कम होत आहे.
तीव्र रक्तक्षयावर आयर्न सुक्रोज तसेच फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. एचएमआयएस अहवालानुसार चालू वर्षात (२०२६-२७ जुलैअखेर) नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती २३५२४ गरोदर मातांची तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून निदान झाले आहे. त्यापैकी २१३३७ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) द्वारे उपचार देण्यात आले असून उपचाराचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
No comments:
Post a Comment