लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान
लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे;
अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तथा पुरस्काराचे मानकरी अजित डोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदी उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजविली. 'केसरी' आणि 'द मराठा' या वृत्तपत्रांद्वारे निर्भीड पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला, तर राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून देशभक्त नागरिक घडविण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करतांना श्री. शाह म्हणाले, देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि निर्णायक बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अत्यंत योग्य असून त्यांच्या कार्यातून देशातील तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment