वन्यप्राण्यांवर विषप्रयोग प्रकरणाची सखोल चौकशी
- वनमंत्री गणेश नाईक
· भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सतर्कता वाढविणार
मुंबई, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाच्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांना विषप्रयोग करून ठार मारल्याच्या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी याविषयी उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य बच्चू कडू, भाई जगताप, सुनील शिंदे, संजय खोडके, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
वनमंत्री नाईक म्हणाले, वन्य प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना केल्या जात आहेत. मानवी वावरास सक्त मनाई असलेल्या भागांमध्ये मानवाचा वावर शोधण्यासाठी सॅटेलाईटच्या माध्यमातून देखरेख, वनरक्षकांचे गस्त पथक आणि स्थानिक नागरिकांशी सुसंवाद वाढवून माहिती संकलित करण्यावर भर दिला जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चौराकुंड वनक्षेत्रात २२ व २३ मे २०२६ रोजी विषप्रयोगामुळे खवले मांजर, भेकर, माकड आदी वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. काही प्राण्यांचे अवयव कुजल्याने तपासात अडचणी आल्या. वन क्षेत्र संचालकांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले असून आरोपीना अटक केली आहे.
No comments:
Post a Comment