Thursday, 2 July 2026

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन नियमित अदा होणार

 ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन नियमित अदा होणार

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, दि. १  : आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) प्रकल्पांतर्गत कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालक (केंद्रचालक) यांचे मानधन यापुढे दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान नियमित अदा करण्यात येईल. मार्च २०२६ पर्यंतचे मानधन वितरित करण्यात आले असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. गोरे बोलत होते.

मंत्री गोरे यांनी सांगितले की, आपले सरकार सेवा केंद्रांचे केंद्रचालक हे ग्रामोद्योजक (Village Level Entrepreneur - VLE) म्हणून कार्यरत असून नागरिकांना विविध बी२सी सेवा उपलब्ध करून देतात. या सेवांमधून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी सहाय्य म्हणून शासनाकडून त्यांना प्रतिमाह १० हजार रुपये मानधन दिले जाते. व्यावसायिक सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध करून त्यातून अतिरिक्त मोबदला मिळविणे अपेक्षित असून, प्रकल्प सुरू झाल्यापासून केंद्रचालकांच्या मानधनात आतापर्यंत दोन वेळा वाढ करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ व आकृतिबंध सुधारण्यासाठी यावलकर समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या समितीने संगणक परिचालक किंवा केंद्रचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे अथवा त्यांना किमान वेतन लागू करण्याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. केंद्रचालकांच्या विविध मागण्यांबाबत त्यांच्या संघटनांसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकींमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांची शासनस्तरावर तपासणी सुरू असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नाना पटोले तसेच अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

<span style="font-size:12pt;line

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi