शालेय शिक्षण विभागाकडील बांधकाम प्रकल्पांना गती
-शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
· कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा
मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध योजनांमधील बांधकाम प्रकल्पांना गती देत ते गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाकडील पुणे येथील शिक्षण आयुक्तालय इमारत, सातारा सैनिकी शाळा, समग्र शिक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना तसेच बालभारती अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.
सातारा सैनिकी शाळेच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण, सुरू व प्रस्तावित विकासकामांसह क्रीडांगण, क्रीडा संकुल आदी सुविधांच्या प्रकल्पांचा घेताना मंत्री भुसे म्हणाले, सातारा सैनिकी शाळा ही महाराष्ट्राची मानबिंदू संस्था आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण काराव्यात. राज्यातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित उपक्रम जिल्हानिहाय राबविण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सैनिकी शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment