Saturday, 27 June 2026

महाड मच्छी मार्केट इमारतीसाठी १५ दिवसांत प्रस्ताव सादर करा

 महाड मच्छी मार्केट इमारतीसाठी १५ दिवसांत प्रस्ताव सादर करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. २५ : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात मच्छी मार्केट इमारत  प्रकल्पाचा परिपूर्ण व सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करून तो १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रस्ताव सादर झाल्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

 

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात मच्छिमार्केट उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयातील दालनात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

 

बैठकीत महाड नगरपरिषदेकडून मच्छी मार्केट उभारणीसंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा मंत्री राणे यांनी घेतला. या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित विक्रेते, मच्छी व्यावसायिक तसेच ग्राहकांना आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

बैठकीस आमदार प्रवीण दरेकर,  मत्स्यव्यवसाय आयुक्त पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi