गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर
तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २२ : गोंदिया जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्याबराबरच गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.
गोंदिया जिल्ह्यातील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला मंजुरी देण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे बैठकीला उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, कृषी विभागाच्या जमीन वापराचे धोरण ठरवावे लागेल. गोंदिया येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्तरावर प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच करंजा येथील तालुका बियाणे गुणन केंद्राच्या परिसरात विविध पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करून पुढील काळात कृषी उद्यान उभारण्याची योजना आहे. करंजा येथील कृषी विभागाच्या जागेवर विविध कार्यालये, प्रयोगशाळा व शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक इमारतींच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या तीन प्रमुख प्रक्षेत्रांभोवती संरक्षणात्मक कुंपण उभारण्याचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment