Monday, 8 June 2026

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

 आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

·         खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपूर, दि. 7 : नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi