राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब
-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 27 : राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी रविवार 28 जून, 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
या मोहिमेसाठी राज्यभरात 89 हजार 489 लसीकरण बुथ, 26 हजार 530 ट्रान्झिट पथके, 13 हजार 518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत.
देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर 2010 मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने देशात या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कायम असून सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात रविवार, 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील अंदाजे 1 कोटी 3 लाख बालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ व्हॅक्सीन (bOPV) चे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.
बुथवर येऊ न शकलेल्या बालकांचे शहरी भागात पुढील पाच दिवस आणि ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गृहभेटीद्वारे लसीकरण करण्यात येईल. तसेच प्रवासात असलेल्या बालकांसाठी ट्रान्झिट, मोबाईल आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फतही मोहिमेच्या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment