राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी
-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.
या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
No comments:
Post a Comment