अनधिकृत रोहित्र प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २५ : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील चिचोरडी रोड परिसरात महावितरण कंपनीकडून नियमाविरुद्ध अनधिकृत एसव्हीडीएस 1x16 केव्हीए रोहित्र बसविण्याच्या तक्रारींची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
चिचोरडी रोड, हिमायतनगर (जि. नांदेड) येथे अनधिकृत एसव्हीडीएस 1x16 केव्हीए रोहित्र बसविण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही न झाल्याने ३ फेब्रुवारी २०२६ पासून उपोषण सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने दोषींवर शिस्तभंगात्मक कारवाई व मागण्यांवर निर्णय घेण्याची गरज सदस्य बाबुराव कदम यांनी विधानसभेत मांडली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य कामे झाल्याच्या तक्रारी असून महावितरणचे सीएमडी आणि संचालक स्तरावरून चौकशी करून अंतिम अहवाल सादर केला जाईल. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
No comments:
Post a Comment