Thursday, 12 June 2025

अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आंतररुग्ण सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध कराव्यात -

 अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील

आंतररुग्ण सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध कराव्यात

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

  मुंबई- दि. 11 :  मुंबईतील जनतेसाठी अंधेरी (पूर्व) येथील औद्योगिक वसाहती मधील कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत असणारे कामगार रुग्णालय महत्त्वाचे असून, हे रुग्णालय सर्व सुविधेसह तातडीने लोकांच्या सेवेत उपलब्ध करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

कामगार रुग्णालयाच्या संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच नगरविकास, उद्योग, कामगार व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देशही दिले असून, मुंबईतील या महत्त्वाच्या प्रश्नी केंद्रीय मंत्री व सचिव यांची भेट घेणार असल्याचे मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

 अंधेरी (पूर्व ) येथील औद्योगिक वसाहती मधील कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत असणारे कामगार रुग्णालयास 2018 साली आग लागली होती. त्यानंतर रुग्णालयातील आरोग्यसेवा बंद करण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण सुविधा सुरु आहे. त्यामुळे कामगार व स्थानिक रुग्णांची गैरसोय होत आहे. आंतररुग्ण सुविधेसह पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी असून, आमदार मुरजी पटेल, आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी याबाबत विधानसभेत येथील प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात मुंबईत विशेष बैठक आयोजित करून अंधेरी येथील रुग्णालयातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी त्यांनी कामगार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी मंत्र्यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची, तसेच विविध विभागांची पाहणी केली. तसेच मंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते टू - डी इको सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी आयोजित बैठकीत मंत्री श्री.आबिटकर यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi