Monday, 23 November 2026

उद्योग आणि डेटा केंद्रांच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव करा

 उद्योग आणि डेटा केंद्रांच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव करा

उद्योग आणि डेटा केंद्रांच्या पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण मालकीची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या कंपनीमार्फत नियमित जलस्रोतांसह महानगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतील प्रक्रिया केलेले पाणी घेऊन त्याचे वितरण करावे. उपलब्ध प्रक्रिया केंद्रांचे संचालन व देखभाल आणि औद्योगिक पाणीपुरवठा यांची एकत्रित व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक धोरणात्मक तरतुदींचा प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

पुणे महानगर प्रदेशातील पाणी मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य कोकणातील सावित्री नदी परिसरातील पाणी कुकडी, भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा आणि नीरा खोऱ्यांकडे वळविण्याच्या नदीजोड पर्यायावरही विचार करावा. त्यासाठी कोकण खोरे ते भीमा खोरे नदी जोड योजना हा चांगला पर्याय होऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगरआयुक्त अभिजित चौधरी यांनी पीएमआरडीएने केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. त्यानुसार, पुणे महानगर प्रदेशाची सध्याची लोकसंख्या सुमारे १.८० कोटी असून २०४७ पर्यंत ती ४.१२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या ३६.९० टीएमसी पाण्याचे आरक्षण उपलब्ध असून मागणी ४१.६५ टीएमसी आहे. सन २०४७ पर्यंत एकूण मागणी सुमारे १०० टीएमसी म्हणजेच ७ हजार ८१६ दशलक्ष लिटर प्रतिदिन होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळणार

 ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळणार

·         मदत व पुनर्वसन विभागाची माहिती

·         दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन संवेदनशील

 

मुंबई, दि. २०: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर तसेच आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. पीक नुकसान, घटलेले उत्पन्न आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मदत देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या दुष्काळी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार मदत वितरित करण्यात येत आहे.

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करणे आणि तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढणे यावर मदत व पुनर्वसन विभागाचा भर आहे. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

हिंगोली येथे पत्रकार व दुर्बल घटकांसाठी घरे, क्रीडा संकुल आणि नानाजी देशमुख स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या

 हिंगोली येथे पत्रकार व दुर्बल घटकांसाठी घरे, क्रीडा संकुल आणि नानाजी देशमुख स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

 

            मुंबई, दि. १९ – हिंगोली शहरात कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे सुरू करावेत. त्याचबरोबर हिंगोली शहरात पत्रकार व दुर्बल घटकांसाठी म्हाडामार्फत घरकुल योजना, जिल्हा क्रीडा संकुल तसेच नानाजी देशमुख स्मारक या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

            महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या तीनही प्रकल्पांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून जमीन उपलब्धतेची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. हिंगोली शहराच्या हद्दीत महसूल विभागाची जमीन उपलब्ध नसल्याने विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींची अदलाबदल करून प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या बैठकीस आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

            पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याच्या मागणीच्या अनुषंगाने सध्या पशुसंवर्धन विभागाकडे असलेली तीन एकर जागा म्हाडाला उपलब्ध करून द्यावी. या जागेवर पत्रकारांसाठी स्वतंत्र वसाहत तसेच दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे नियोजन करावे, असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. यासाठी पशुसंवर्धन विभागाला आवश्यक असलेली महसूल विभागाच्या ताब्यातील गावाबाहेरील उपयुक्त जागा देण्याबाबत प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करावा. या प्रस्तावास पशुसंवर्धन विभागाची मान्यता घेऊन तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

क्रीडा संकुलासाठी जागा

            हिंगोलीतील सध्याचे क्रीडा संकुल शहराबाहेर असल्याने शहरातील कृषी विभागाच्या ताब्यातील आणि क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर संकुल उभारण्याबाबत कार्यवाही करावी. त्यासाठी कृषी विभागाला पर्यायी ठिकाणी जमीन उपलब्ध करून देऊन संबंधित जागा जिल्हा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.

 

सैनिकी शाळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय

 सैनिकी शाळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

            शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, राज्य सैनिकी शाळा मूल्यांकन व सक्षमीकरण आराखडा तसेच सैनिकी शाळा सुधारीकरण समितीने राज्यातील प्रत्येक शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक, प्रशासकीय आणि सैनिकी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सखोल पाहणी केली आहे. त्यानंतर अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाने या संस्थांना सुमारे ३० एकर जमीन आणि विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा प्रभावी वापर करून शाळांच्या कामकाजातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

 

            आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शुल्कसहाय्य देण्याबाबत विचार करावा. सैनिकी शिक्षणाची आवड आणि क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी राज्य अथवा जिल्हास्तरावरील प्रवेश परीक्षा अधिक काटेकोर व गुणवत्ताधारित करावी. तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि अन्य संरक्षण अकादमींमधील प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

            भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून, या संस्थेत विद्यार्थिनींची पहिली तुकडीही सध्या प्रशिक्षण घेत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून संधी मिळविण्यासाठी अधिक सक्षम करता येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी नमूद केले.

मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित प्रकल्पांना गती द्या

 मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित प्रकल्पांना गती द्या

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत असलेल्या जल नियोजनाची तसेच विविध जलस्त्रोतांची माहिती सादर केली. या सादरीकरणानुसार मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या सुमारे २.७५ कोटी आहे. २०५१ पर्यंत एकूण पाण्याची मागणी १६ हजार १३९ दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित धरण प्रकल्पांबरोबरच सांडपाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर दुय्यम व तृतीयक (टर्शरी) प्रक्रिया, स्वतंत्र वितरण वाहिन्या आणि पर्जन्यजल संचयनाचा समावेश जलनियोजनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणारपंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी ताज समूहासोबत सामंजस्य करार

 पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीमुळे शिर्डीच्या

पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         शिर्डी विमानतळावर पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी ताज समूहासोबत सामंजस्य करार

 

            मुंबई, दि. १७ : शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे शिर्डी विमानतळ परिसरात विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

            या सामंजस्य करार प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ आहे.श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. शिर्डी विमानतळामुळे या भागाची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली असून, विमानतळाच्या परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित होईल व पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल.

 

            या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी टाटा समूह आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ताज समूहासारख्या नामांकित हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे शिर्डी विमानतळासह परिसराच्या विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनवाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच  शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने शिर्डी विमानतळाच्या कामालाही अधिक गती द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Sunday, 22 November 2026

महाराष्ट्र भूषणसह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात बैठक · सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

 महाराष्ट्र भूषणसह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात बैठक

·         सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

 

            मुंबई, दि. १७ : राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांच्या सदस्यांशी पुरस्कारांच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा करण्यात आली.

 

विविध पुरस्कारांचा आढावा

                        तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हे २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांसाठी देण्याबाबत चर्चा झाली. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार २०२६-२७ या वर्षासाठी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

 

            महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांच्या पुरस्कार निवडीसंदर्भातही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

 

            या विविध पुरस्कारांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी २५ लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

            बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर, कार्यक्रम अधिकारी  निलेश धुमाळ आणि  मिलिंद बिर्जे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

00000


Featured post

Lakshvedhi