Friday, 13 November 2026

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्या व्यापार मेळ्याचे उद्घाटन

 केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्या व्यापार मेळ्याचे उद्घाटन

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) आयोजित45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2026 चे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘विकास  आणि विरासत’ ही संकल्पना असलेल्या या मेळ्यात 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेश, 11 देश आणि 3500 हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत. बिहार, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्ये असतील. मेळ्यात 17 प्रदर्शन दालनांसह स्टार्टअप्स, पारंपरिक हस्तकला, स्थानिक उत्पादने, खाद्यसंस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे. तसेच सात ठिकाणी 87 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, 14 ते 18 नोव्हेंबर हे दिवस व्यावसायिक अभ्यागतांसाठी, तर 19 ते 27 नोव्हेंबरदरम्यान मेळा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

Thursday, 12 November 2026

विकास आणि वारसा - महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, उद्यमशीलता आणि आधुनिक प्रगतीचा संगम’

 विकास आणि वारसा संकल्पनेतून महाराष्ट्राचे दर्शन

‘विकास आणि वारसा -  महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, उद्यमशीलता आणि आधुनिक प्रगतीचा संगम’  ही या दालनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक वाडा वास्तुशैलीवर आधारित दालनाची रचना करण्यात आली असून, प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, जोतिराव फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा  यांच्या कार्याचा गौरव करणारी शिल्परचना साकारण्यात आली आहे. पारंपरिक दीपमाळ, मावळे आणि तुळशी वृंदावन यांच्या प्रतिकृतींमधून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.

 

दालनात कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, पैठणी, हस्तकला, वस्त्रोद्योग, लाकडी खेळणी, बंजारा कला, पारंपरिक धातूकाम, दागिने आणि भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याशिवाय विणकाम आणि सूत कताईचे थेट प्रात्यक्षिकही नागरिकांना पाहता येणार आहे.

पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकासाचे प्रदर्शन

 पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकासाचे प्रदर्शन

महाराष्ट्राच्या औद्योगिक व पायाभूत विकासाची माहिती देणारे विशेष विभाग दालनात उभारण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी हब’ या विभागात अटल सेतू, महामार्ग, उन्नत मार्ग आणि आधुनिक वाहतूक सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र मानबिंदू’ विभागातून भारतरत्न व पद्म पुरस्कारप्राप्त महाराष्ट्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणा, आधुनिक शेती आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील राज्याच्या प्रगतीचे चित्रणही करण्यात आले आहे.

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार · महाराष्ट्र दालनाचे शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन · फोक आख्यानाचे 24 ला आयोजन

 दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात

महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार

 

·         महाराष्ट्र दालनाचे शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

·         फोक आख्यानाचे 24 ला आयोजन

 

नवी दिल्ली, दि. 12 :देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ‘भागीदार राज्य म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे उद्घाटन येत्या  शनिवारी (14 नोव्हेंबर ) सायंकाळी 4 वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदान येथे 14 ते 27  नोव्हेंबरदरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातून महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, औद्योगिक प्रगती, उद्यमशीलता आणि विकासाचा प्रवास देश-विदेशातील नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास  उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ.श्वेता सिंघल, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, व्यवस्थापकीय संचालक  प्रेरणा देशभ्रतार, उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या दालनात एकूण 64 कक्षांचा समावेश आहे. एक जिल्हा एक उत्पादन (ओडिओपी) योजनेंतर्गत जिल्हानिहाय वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, महिला बचत गट, महिला उद्योजिका, शासकीय महामंडळे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या उत्पादनांना येथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गोंदियातील भटक्या विमुक्त जमातीतील मुलांनी घेतली राज्यपालांची भेट; प्रथमच समुद्र पाहून मुले अचंबित

 गोंदियातील भटक्या विमुक्त जमातीतील मुलांनी घेतली राज्यपालांची भेट;

प्रथमच समुद्र पाहून मुले अचंबित

 

मुंबई, दि. १२ : गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथे पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील उपेक्षित, वंचित मांग गारुडी समाजाच्या ३० मुलामुलींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेतली व राज्यपालांशी मनमोकळ्या गप्पा केल्या.

 

रोजगारासाठी पालकांच्या होणाऱ्या स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विदर्भात अनेक ठिकाणी पालावरची शाळा चालविणाऱ्या भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र व भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

 

"मुंबईत आपण नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर, विधान भवन पाहिले परंतु आज येथून पाहिलेला समुद्रच सर्वांना खूप आवडला," अशी माहिती यावेळी मुलांनी राज्यपालांना दिली.

 

भटके विमुक्त विकास परिषद ही संस्था भटक्या विमुक्त जमातीतील मुलामुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जीवनदान देण्याचे राष्ट्रकार्य करीत आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. 

 

यावेळी राज्यपालांसमोर मांग गारुडी समाजातील ३० विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठ म्हणून दाखवला.  पाठांतर व उच्चाराबाबत राज्यपालांनी मुलांना कौतुकाची थाप दिली.

 

भटके विमुक्त जमातीतील मुलामुलींना परिषदेने शिक्षण व संस्कारांसोबत रोजगारोन्मुख प्रशिक्षण द्यावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. सर्वांनी शिक्षण घ्यावे, अभ्यास करावा व उत्तम भविष्य बनवावे असा सल्ला राज्यपालांनी यावेळी मुलांना दिला.  पुढील सुट्ट्यांमध्ये आपण मुलामुलींना पुणे दर्शन घडविण्यासाठी सूचना करू, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

 

भटके विमुक्त जमातीतील पालकांचे रोजगारासाठी गोंदिया येथून छत्तीसगड, ओडिसा, हरियाणा, पंजाब व काश्मीरपर्यंत स्थलांतर होत असल्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात व बरेचदा व्यसनांच्या आहारी जातात. अशा मुलांसाठी पालावरची शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे शिक्षा आयाम प्रमुख प्रशांत सुरेश बोरसे यांनी राज्यपालांना दिली.

 

सर्व मुलामुलींना अभ्यास व शिस्तीसोबतच खर्रा न खाण्याची, जुगारासाठी पत्ते न खेळण्याची तसेच चांगले नागरिक होण्याची शपथ दिली जाते तसेच त्यांना भगवद्गीतेतील अध्याय शिकवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

मुलामुलींना दररोज खेळ खेळण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले जाते असे प्रशांत बोरसे व उर्मिला बोरसे यांनी सांगितले.

0000


 


हवामान बदलावर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या कवडक येथील कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण

 हवामान बदलावर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या


  • कवडक येथील कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण

 

नागपूर, दि. 12 : हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नाविन्यतेवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित दिवंगत दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॅा. पंकज भोयर, शालीनीताई मेघे, आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीय, शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत एम.डी. भाटिया इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रथम क्रमांक · महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनतर्फे दिवाळीनिमित्त स्पर्धेचे आयोजन; · मुंबईतील १७ शाळांचा सहभाग

 किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत एम.डी. भाटिया इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रथम क्रमांक

·         महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनतर्फे दिवाळीनिमित्त स्पर्धेचे आयोजन;

·         मुंबईतील १७ शाळांचा सहभाग

 

मुंबई, दि. ५ : बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासोबतच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची आणि गड-किल्ल्यांच्या समृद्ध परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन तर्फे आयोजित किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत घाटकोपर (पूर्व) येथील एम.डी. भाटिया इंग्लिश मीडियम स्कूलने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकाविला. सायन येथील डी.एस. हायस्कूलने साकारलेल्या तातेगड सुंदरगड किल्ल्याला द्वितीय, तर गावदेवी येथील सेंट कोलंबा हायस्कूलने साकारलेल्या तोरणा किल्ल्याला तृतीय क्रमांक मिळाला.

 

महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई या शासकीय संस्थेतर्फे ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. बालकांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, तसेच त्यांचे जतन व संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त किल्ला बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धेसाठी मुंबईतील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले. पाच विद्यार्थ्यांचा एक संघ याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आपल्या कल्पकतेचे, कलाकौशल्याचे आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या जाणिवेचे दर्शन घडविले.

 

स्पर्धेतील उत्तेजनार्थ पाच पारितोषिकेही जाहीर करण्यात आली. यामध्ये सेंट इग्नेशियस हायस्कूल, साने गुरुजी रोड, जेकॉब सर्कल (रायगड), चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव (रायगड), महिला मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, कुर्ला पश्चिम (सिंहगड), मॉडेल हायस्कूल, वाशी नाका (देवगिरी) आणि अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी (प्रतापगड) यांचा समावेश आहे.

 

या स्पर्धेचे परीक्षण बालश्री पुरस्कार विजेते सुमित पाटील आणि ओमकार वेजरे यांनी केले. जवाहर बालभवनच्या संचालिका नीता पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Featured post

Lakshvedhi