Monday, 26 October 2026

आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न

 आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न

- 

आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कलाकृती या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या शबरी नॅचरल्स ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी या उपक्रमाची दखल घेतल्याने अभिमानाची बाब असून, आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केले.

शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

 शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव

‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना जागतिक ओळख

मुंबई, दि. २५ : शबरी नॅचरल्सचे पॅकेजिंग हे केवळ उत्पादनांचे वेष्टन नसून त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. या पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ जाहीर झाल्याने आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून शबरी नॅचरल्सच्या उपक्रमाचे कौतुक केले. पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात शबरी नॅचरल्सचा विशेष उल्लेख केला.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमातून ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना चालना मिळत असून, आदिवासी उद्योजकतेला नवी दिशा मिळत आहे.

शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचे पॅकेजिंग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या कला परंपरा तसेच आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब या पॅकेजिंगमधून उमटते. त्यामुळे उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची ओळख ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ तसेच जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. या सन्मानांमुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे

आदिवासी बांधवांनी तयार केलेली नैसर्गिक उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी शबरी नॅचरल्सने डिजिटल माध्यमांचा अवलंब केला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना ही उत्पादने सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे दुर्गम भागांतील आदिवासी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे

यासोबतच कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातूनही शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बांबू हस्तकला, नैसर्गिक व कृषी उत्पादने तसेच मोहापासून तयार केलेल्या वस्तूंच्या आकर्षक भेटसंचांना विविध संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून मागणी मिळत आहे. या माध्यमातून आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडून आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे

इंडिया ज्वेलरी पार्कमुळे नवी मुंबईचे जागतिक स्तरावरील महत्त्व वाढणार

 इंडिया ज्वेलरी पार्कमुळे नवी मुंबईचे जागतिक स्तरावरील महत्त्व वाढणार

                                                                                                            - वनमंत्री गणेश नाईक

     औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा, यादृष्टीने शासनाच्या विविध यंत्रणा योग्य दिशेने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. भविष्यात नवी मुंबईची ओळख डेटा सेंटर हब म्हणून निर्माण होण्याबरोबरच इंडिया ज्वेलरी पार्कमुळे जागतिक स्तरावर या शहराचे महत्त्व अधिक वाढणार आहे. राज्यासमोर नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेच्या लाटेसारखी आव्हाने असतानाही शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना शाश्वत जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा शासन प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

     रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि रत्न व आभूषण उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व विशद केले.

00000

ज्वेलरी उद्योगात २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार

 ज्वेलरी उद्योगात २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार

                                                                                                             - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

     इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील. महापे येथील २२ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारे हे अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील रत्न व आभूषण उत्पादन, व्यापार आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

     मुंबईच्या झवेरी बाजाराला रत्न व आभूषण व्यापाराचा समृद्ध इतिहास असून, बीकेसी येथील भारत डायमंड बोर्स आणि सीप्झसारख्या केंद्रांनी मुंबईला जागतिक हिरे व्यापार आणि दागिने निर्यातीच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईतून होते. या उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने जेम्स अँड ज्वेलरी धोरणाच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि राज्यातील रत्न व आभूषण निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

     इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, कामगारांच्या निवासाची व्यवस्थाही विचारात घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी आणि प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

इंडिया ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा महापे

 इंडिया ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा

     महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.आजपासून ३० ते ४० वर्षांनंतर मागे वळून पाहताना इंडिया ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे निश्चितपणे स्मरण केले जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

      उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कामात कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

     उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि उद्योग यांच्यातील समन्वय व भागीदारी महत्त्वाची आहे. उद्योगांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड

 महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड

     मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल

 इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल

                                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

महापे येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ

 

ठाणे, दि. २५ (जिमाका):- मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन आणि उद्योगाच्या  माध्यमातून ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

      नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी, उपाध्यक्ष शौनक पारिख आदी मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi