Monday, 26 October 2026

शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

 शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव

‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना जागतिक ओळख

मुंबई, दि. २५ : शबरी नॅचरल्सचे पॅकेजिंग हे केवळ उत्पादनांचे वेष्टन नसून त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. या पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ जाहीर झाल्याने आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून शबरी नॅचरल्सच्या उपक्रमाचे कौतुक केले. पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात शबरी नॅचरल्सचा विशेष उल्लेख केला.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमातून ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना चालना मिळत असून, आदिवासी उद्योजकतेला नवी दिशा मिळत आहे.

शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचे पॅकेजिंग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या कला परंपरा तसेच आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब या पॅकेजिंगमधून उमटते. त्यामुळे उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची ओळख ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ तसेच जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. या सन्मानांमुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे

आदिवासी बांधवांनी तयार केलेली नैसर्गिक उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी शबरी नॅचरल्सने डिजिटल माध्यमांचा अवलंब केला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना ही उत्पादने सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे दुर्गम भागांतील आदिवासी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे

यासोबतच कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातूनही शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बांबू हस्तकला, नैसर्गिक व कृषी उत्पादने तसेच मोहापासून तयार केलेल्या वस्तूंच्या आकर्षक भेटसंचांना विविध संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून मागणी मिळत आहे. या माध्यमातून आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडून आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi