Sunday, 31 December 2023

एफडीसीएम' कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश वनविभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान : वनमंत्री

 एफडीसीएम' कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश

वनविभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

        मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त होणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे. चंद्रपूर येथे नुकत्याच (दि. 28 डिसेंबर) वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे एफडीसीएम च्या अहवालबाबत कॅगने देखील "नील" चा शेरा देऊन अहवाल पारदर्शी असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे.

            यासंदर्भात बोलताना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाला वनविकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या मोजक्याच महामंडळाकडून आर्थिक लाभ शासनाला मिळतो. त्यात वनविभाग कुठेही मागे नाही, तर सतत अग्रेसर असल्याचे अत्यंत समाधान होत आहे. वनक्षेत्र विकास, बांबू लागवडीला प्रोत्साहन, विक्रमी वृक्ष लागवड, उत्तम दर्जाचे सागवान लावून योग्य विपणन व्यवस्था यांसह प्रत्येक बाबतीत वन विकास महामंडळाचे नियोजन उल्लेखनीय आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरासाठी गेलेले काष्ठ, संसदेच्या नवीन इमारतीत सेंट्रल व्हिस्टासाठी गेलेले काष्ठ महाराष्ट्राच्या वन क्षेत्रातून पाठवले गेल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

            एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनबल प्रमुख शैलेश टेंभूर्णीकर आणि त्यांच्या पथकाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

            नवनवीन संकल्पना राबवून वनक्षेत्र वाढीसाठी तसेच वनांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे काम गतीने सुरू आहे. एमआयडीसी च्या धर्तीवर एफआयडीसी ची निर्मिती करून फर्निचर व इतर साहित्याकरिता मोठे दालन उभे राहणार आहे. यामुळे उद्योगाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे.

            वनविकास महामंडळाकडून गेल्या दहा वर्षात शासनाला मिळालेल्या  लाभांशाचा आढावा घेतल्यास तो  सन  2014-2015 मध्ये 45.42 लक्ष रुपयांपासून  2022-2023 मध्ये 582.00 लक्ष रुपये असा प्रगतीचा आलेख अधोरेखित होतो.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारी

दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

        मुंबई, दि. ३० - राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.

            या कालावधीत सर्व कार्यालयांमधून मराठी भाषेसंबंधी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिर, कवीसंमेलन, नाट्य, घोषवाक्य, अभिवाचन, कथाकथन, पुस्तकांचे रसग्रहण, वादविवाद यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करावे. याशिवाय मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध माध्यमांतून याबाबतचे दृक श्राव्य संदेश प्रसारित करावेत. ग्रंथ प्रदर्शन, दिंडी, पुस्तक भेट देणे, पुस्तक जत्रा, समाजमाध्यमांवर मराठी वाचन कट्टा आदी उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

            मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई बुक, ऑनलाईन विक्री, लेखक प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, माहितीपट लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

            भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मुंबई मराठी साहित्य संघ आदी साहित्य सस्थांची मदत घेता येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.

0000

वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 

मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

 

            मुंबई दिनांक 31: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.  

 

            मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

 

            याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

000


स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

 

            मुंबई, दि. 31 : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

महास्वच्छता अभियान राज्यभर

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

 

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

 

            मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

 

            विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

 

            मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

 

            मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

 

            तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला.   अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, सदानंद धवन उद्यान, भोईवाडा येथे भेट देऊन सफाई कर्मचारी व मुलांशी संवाद साधला.

000


 

भवताल

 भवताल" डिसेंबर २०२३ अंक !



नमस्कार.
"भवताल मासिका" चा डिसेंबर २०२३ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्यात पुढील विषय वाचायला मिळतील=

• मंझानारेस बये (आपल्याकडील नदीकाठच्या लेखकाने स्पेन मधील नदीशी साधलेला संवाद)
• जंगलांकडून माळरानांकडे... (भवताल दिवाळी विशेषांकाचे संपादकीय)
• मृत्यूशय्येवर माळढोक (माळढोक पक्ष्याची माहिती, सद्यस्थिती मांडणारा लेख)
• मेघालय डायरी (मेघालय राज्याचे आगळे-वेगळे पैलू मांडणारी मालिका)
• आणि इतरही...

सोबत अंकाची PDF कॉपी, कव्हर आणि अंकाची नावनोंदणी करण्याची लिंक देत आहोत.
कव्हर व लिंक आपल्या संपर्कात शेअर करून लोकांना अंकाची नावनोंदणी करण्यास सांगावे, हे आवाहन.

नावनोंदणीसाठी लिंक:

- संपादक, भवताल मासिक

................

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

कुठले पुस्तक कुठला लेखक

 कुठले पुस्तक कुठला लेखक


लिपी कोणती कसले भाकित


हात एक अदृश्य उलटतो


पानामागून पाने अविरत


गतसालाचे स्मरण जागतां


दाटून येते मनामधे भय


पान हे नवे यात तरी का


असेल काही प्रसन्न आशय


अखंड गर्जे समोर सागर


कणाकणाने खचते वाळू


तरी लाट ही नवीन उठता


सजे किनारा तिज कुरवाळू


स्वतः स्वतःला देत दिलासा


पुसते डोळे हसतां हसतां


उभी इथे मी पसरुन बाहू


नवीन वर्षा तुझ्या स्वागता

Bye bye good night कल फिर मिलेंगे


Featured post

Lakshvedhi