Thursday, 24 September 2026

माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ · गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती

 माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’

·         गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती

            मुंबई, दि. २४ : केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारत संकल्प केला आहे. त्यानुसार  महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून करण्यात येत आहे.

       मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोकसंवाद उपक्रमाचा भाग म्हणून  माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर भक्तगण, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना शासनाच्या योजना, उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली.

       या उपक्रमात ‘नशामुक्त  मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र', इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी  करण्यात आले.


महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात विशेष महिला रोजगार मेळाव्याचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन

 महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात

विशेष महिला रोजगार मेळाव्याचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन

 

मुंबई, दि.२४: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने “पंडीत दिनदयाळ रोजगार महाकुंभ ”या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठात भव्य महिला विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना थेट उद्योग व आस्थापनांशी जोडणे तसेच कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे व ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार, प्रो. हेमलता बागला (अति. कार्य.) आणि कुलगुरू श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ  यांचेकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व परिसरातील सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना या माध्यमातून त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे. १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र महिला उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्व-नोंदणी पूर्ण करावी.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याचा अधिकृत तपशील खालीलप्रमाणे आहे.

दिनांक: २९ सप्टेंबर २०२६

वेळ: सकाळी ९ वाजेपासून

स्थळ: एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसर, चर्चगेट

पात्रता: १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमाधारक व सर्व पात्र महिला उमेदवार.

मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्यवस्था

Ø  ३० स्टॉल्सची उभारणी : मेळाव्यात महिला उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

Ø  २०+नामांकित आस्थापनांचा सहभाग : विविध क्षेत्रांतील २० हून अधिक कंपन्या व आस्थापना थेट मुलाखतींद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

Ø  ५ शासकीय महामंडळांचा सहभाग : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ प्रमुख शासकीय महामंडळे या मेळाव्यात सहभागी होत आहेत. ही महामंडळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा आणि इतर उपक्रमांची थेट माहिती देतील.

Ø  कौशल्य विकास प्रशिक्षण : विविध कौशल्य प्रशिक्षण योजना व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देणारे विशेष स्टॉल्स येथे उपलब्ध असतील.

Ø  जपानमधील रोजगाराच्या संधी : मेळाव्यात उमेदवारांना थेट जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता एक स्टॉल चे नियोजन करण्यात आले आहे. ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुंबई शहर मधील सर्व उद्योजकांनी आणि बेरोजगार  महिलांनी  या “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ” मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना

 दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.अत्यल्प पाऊसमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याच प्रमाणे चारा उपलब्धतेसाठीही दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेटपणे मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरु होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सईताई डहाके आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी,  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरीबांधव उपस्थित होते

मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतातील नुकसानाची पाहणी

 मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी · शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार · म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

·         शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार

·         म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी

 

            वाशिम, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

 

            दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

 मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ

            राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण गेल्या चार वर्षांत वाढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्रवेशांपैकी ३२.७२ टक्के प्रवेश मुलींचे होते. हे प्रमाण २०२६-२७ मध्ये वाढून ३७.२७ टक्के झाले आहे. ही सकारात्मक बाब असून, मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

            शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबईत रंगणार ‘गायन वादन महोत्सव’ · 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान ‘लतानंद’, ‘सप्तसूर’ आणि ‘भावबंध’ची सुरेल मेजवानी

 मुंबईत रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

·         28 ते 30 सप्टेंबरदरम्यान ‘लतानंद’, ‘सप्तसूर’ आणि ‘भावबंध’ची सुरेल मेजवानी

 

                मुंबई, दि. २३  :रसिकांना विविध संगीत प्रकारांचा सुरेल अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘गायन वादन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर, मुंबई येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

            महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ‘लतानंद’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांमधील वाद्यसुरांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार असून कमलेश भडकमकर आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

            मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी ‘सप्तसूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरांच्या विश्वातील एका अजरामर संध्याकाळचा अनुभव देणारा हा कार्यक्रम केदार देशमुख आणि संच सादर करणार आहेत.

            बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भावबंध’ हा संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. भावगीतांचे रेशीमधागे आणि चित्रपट गीतांची स्पंदने यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार असून प्राची कोकीळ मराठे व सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध संगीत प्रकार आणि कलाविष्कार रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            ‘गायन वादन महोत्सवा’तील सर्व कार्यक्रमांस प्रवेश विनामूल्य असून मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीन दिवसांच्या या सुरेल संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi