Thursday, 20 August 2026

मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत

 मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण

 

नागपूर, दि. २० : मिहान इंडिया लिमिटेडतर्फे सामाजिक बांधीलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांसाठी सीएसआर निधीचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध संस्था आणि नागपूर महानगरपालिकेला एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांचे धनादेश रामगिरी या मुख्यमंत्री निवासस्थानी प्रदान करण्यात आले.

 

यामध्ये जीविका फाऊंडेशनला सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपये देण्यात आले. नागपूर महानगरपालिकेला सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३५ लाख रुपये, तर महिला सक्षमीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी १० लाख रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला.

 

याशिवाय वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर येथील महाविद्यालयीन इमारत आणि सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला. या निधीमुळे आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथेही पाहणी

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथेही पाहणी केली. सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. या रुग्णालयात मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक, शस्त्रक्रियागृह यांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करतानाच कामाचा वेग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मेडिकल- मेयोमधील कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी



मेडिकल- मेयोमधील कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


· सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीची चौकशी

नागपूर, दि. २० : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची तसेच वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली.

नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे भेट दिली. रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्याही दृष्टीने या दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे. मेडिकलमध्ये एनआयसी, पीआयसीयू येथे भेट देऊन पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर यूनिटचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियागृह, सर्जिकल आयसीयू येथेही मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.


 

मनपातर्फे विशेष मोहीम गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी

 मनपातर्फे विशेष मोहीम

गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जलपर्णीमुळे तलावाचा मोठा परिसर व्यापला गेला होता. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होण्यासोबतच जलतरणपटू आणि नौकायनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

 

जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी आणि वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली असून अंबाझरी तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि खुला झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी मनपाने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.

महामंडळांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांनी समन्वय साधावा

 महामंडळांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

 विभागांनी समन्वय साधावा

- उपसभापती सचिन अहिर

 

            मुंबई, दि. १९ : क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती, सचिन अहिर यांनी दिले.

            विधानभवन येथे उपसभापती, सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आढावा बैठक झाली. या बैठकीत क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित १९ शिफारशी तसेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद, योजनांना शासन मान्यता, तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याच्या सूचना उपसभापती अहिर यांनी यावेळी दिल्या.

             २१ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासह संबंधित महामंडळांच्या योजनांबाबत विविध विभागांना निर्देश देण्यात आले होते. सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास, नगरविकास, गृह आणि सामान्य प्रशासन विभागांशी संबंधित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही यासंदर्भात अंमलबजावणीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

            कृषी व कृषी-आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तेलगिरणी, गहू, डाळी, पोहा आदी प्रक्रिया उद्योगांशी संबंधित दोन योजनांचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. या योजनांच्या माध्यमातून मातंग समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.     महामंडळाच्या योजनांसाठी योग्य वित्तीय नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या संबंधित संस्थांमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध असतानाही योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महामंडळाच्या विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांचा सहभाग, वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणारे कर्ज, प्रकल्पासाठी आवश्यक लाभार्थी हिस्सा आणि महामंडळाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत याबाबतही चर्चा झाली.

            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संदर्भातील बैठकीतील निर्देशांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी प्रलंबित निर्णयांची कार्यवाही गतीने पूर्ण करून आवश्यक धोरण व आर्थिक तरतुदी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेसाठी यावर्षी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून सुमारे १०० कोटी रुपये करण्यात आली असून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेला गती आणि सुलभता

 डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेला गती आणि सुलभता

राज्यात सध्या सुमारे एक लाख १५ हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असून, त्यापैकी तब्बल ६० ते ७० हजार संस्थांचे अद्याप 'डीम्ड कन्व्हेअन्स' झालेले नाही. सहकार, महसूल, जमाबंदी आणि नोंदणी महानिरीक्षक विभागांच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांच्या मालमत्ता पत्रकावर (प्रॉपर्टी कार्ड) किंवा सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांमध्ये आता गृहनिर्माण संस्थांच्या नावाची नोंद करण्यात यावी, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी केल्या.

 

म्हाडामधील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी शासनाने अकृषिक कर यापूर्वीच रद्द केला आहे. तरीही काही ठिकाणी तो वसूल केला जात असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच इमारतींमधील नागरी कमाल जमीन धारणा (युएलसी) आरक्षित असलेल्या सदनिकांबाबत योग्य कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

00000

स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार

 स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार

सध्या अनेक संस्था एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) मध्ये समाविष्ट नसल्याने त्यांच्या स्वयंपुनर्विकासात अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी २०१९ च्या शासन निर्णयानुसार इतर करांमध्ये सवलत देण्याचे आणि १० टक्के प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह) देण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, स्वयंपुनर्विकासासाठी 'वर्क कॉन्ट्रॅक्ट' आणि 'डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट' बाबतचा सुटसुटीत मसुदा तयार करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वित्त विभागाकडून चार टक्के सवलत मिळण्यासाठी गृहनिर्माण विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा आणि नोंदणी महानिरीक्षकांकडून याबाबत स्पष्टता घ्यावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

Featured post

Lakshvedhi