Wednesday, 5 August 2026

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण

 महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून

देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण

– मंत्री आदिती तटकरे

• सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन

• नोकरदार महिलांना दर्जेदार खाद्यपदार्थ व घरगुती वस्तू सहज उपलब्ध होणार

 

मुंबई, दि. ४: शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये व वसतीगृहांमध्ये सहज उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळेल असे सांगून राज्यात अशा स्वरूपाचे ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ या प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिर्वेदशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फाउंडेशनच्या संस्थापक आर. विमला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.

यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यांची थेट ग्राहकांपर्यंत पोहोच वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. शासकीय कार्यालये, तहसील कार्यालये, प्रांत कार्यालये तसेच मेट्रो स्थानक परिसरात अशा विक्री व्हॅन कार्यरत झाल्यास महिला उद्योजकांच्या व्यवसायाला चालना मिळेल. रेडी-टू-ईट पदार्थ, मिलेट उत्पादने, घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापरातील साहित्य नोकरदार महिलांना त्यांच्या कार्यस्थळी सहज उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ वाचेल आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे होणारे वीज वाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत विद्युत लाईनचा डीपीआर तयार करा

 सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे होणारे वीज वाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत विद्युत लाईनचा डीपीआर तयार करा

-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे वीज वहन तारा व विद्युत खांबांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करावा असे सांगून या कामासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची मागणी करण्याच्या सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

निर्मल भवन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकर यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, ज्या भागात वीजेवरील भार (लोड) अधिक आहे, त्या ठिकाणी विद्यमान ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात यावी. तसेच वाढत्या मागणीचा विचार करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर भर द्यावा, असेही म्हणाल्या.

सॉल्ट पॅन जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेताना पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेणे

 सॉल्ट पॅन जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेताना पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले. भविष्यात या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यास प्रकल्पग्रस्त, बेघर नागरिक, गिरणी कामगार आणि इतर वंचित घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यात यावी, असे त्यांनी सुचविले.

ताब्यातील बंद पडलेल्या गिरणीच्या जमिनी या गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने म्हाडाच्या ताब्यात

 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याशी झालेल्या सुमारे २५ मिनिटांच्या बैठकीत देशातील व राज्यातील सूतगिरण्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. कोविड-१९ कालावधीपासून अनेक सूतगिरण्या बंद असून, त्यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे व कामगारांना देखील वेतन प्राप्त होत नाही सदर वेतनाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. एनटीसीच्या जागेवर असणाऱ्या चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत देखील चर्चा करण्यात आली.तसेच एनटीसीच्या ताब्यातील बंद पडलेल्या गिरणीच्या जमिनी या गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने म्हाडाच्या ताब्यात देण्याच्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली. एनटीसीच्या गिरण्यांच्या कामकाजाबाबत देखील चर्चा करण्यात आली.सदर विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिल्याची माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वेसेवा आणि इतर प्रवासी सुविधांबाबत सकारात्मक चर्चा

 केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वेसेवा आणि इतर प्रवासी सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि परिसरातील रेल्वे स्थानकांच्या उन्नतीकरणासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील कुलाबा, बॅलार्ड पिअर आणि परिसरातील हजारो झोपड्या तसेच मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास ना हरकत प्रमाणपत्र

 मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील कुलाबा, बॅलार्ड पिअर आणि परिसरातील हजारो झोपड्या तसेच मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही अहीर यांनी सांगितले.

मुंबईतील केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी

 गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईतील केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी एकसमान धोरणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींसाठी वेगवेगळे नियम व निकष लागू असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, एकाच शहरात पुनर्विकासासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब होऊ नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

Featured post

Lakshvedhi