Friday, 8 May 2026

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक

 निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी आहे.

 

मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक

दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले (89.56 टक्के) तर एकूण 7,22,045 मुलींपैकी 6,85,672 मुली (94.96 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक आहे.

 

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्के, मुंबई- 94.97, पुणे- 94.24, नाशिक- 90.53, अमरावती- 90.50, नागपूर- 89.07 तर लातूर विभागाचा निकाल 88.42 टक्के लागला आहे.

 


 

श्रेणीनिहाय निकाल

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 27.41 टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 31.26 टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये 24.66 टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 8.75 टक्के इतके आहे.

 

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027 च्या दहावीच्या  परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून

दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 

•         राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

•         मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक

•         कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के

 

मुंबई, दि. 8 : दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.

 

मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही पहिली पायरी आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने तिचा लाभ घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात तज्ज्ञांचे मत

 आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान

  • टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात तज्ज्ञांचे मत

 

मुंबई, दि. ८ : कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजीत टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

 

मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित या प्रशिक्षण सत्रात डेटा व्यवस्थापन, माहिती केंद्रे, जीपीयू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालींच्या वापराबाबत प्रायमस पार्टनर्सचे अभिजित धर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), महाराष्ट्राच्या राज्य सूचना अधिकारी सपना कपूर तसेच गुगलचे वरिष्ठ तांत्रिक विशेषज्ञ प्रवीण दवे यांनी मार्गदर्शन केले.

 

Thursday, 7 May 2026

जयगड बंदरांच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या

 जयगड बंदरांच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या

-मंत्री नितेश राणे

·         कोकणातील हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. ६ : कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालक प्रीती चौधरी, जेएसडब्ल्यू पोर्टचे दिलीप शेट्टी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह बंदरे, परिवहन, महाराष्ट्र सागरी मंडळासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे असून या बंदरातून निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखत कामे गतीने व दर्जेदार करावीत. कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतसाखळी व्यवस्था, तपासणी प्रक्रिया, वाहतूक साखळी तसेच बंदरांमधील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

 एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. ६ :- मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 


 

मंत्री नितेश राणे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, जेणेकरून सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने राबविता येईल, असेही ते म्हणाले.

 

जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी, अशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

 

जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली

राग, तणाव किंवा नकारात्मक परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा विराम घेऊन विचारपूर्वक

 राग, तणाव किंवा नकारात्मक परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा विराम घेऊन विचारपूर्वक प्रतिसाद द्यावा, असे मार्गदर्शन करत त्यांनी ‘रिएक्शन’ ऐवजी ‘रिस्पॉन्स’ देण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला. “काही क्षण थांबा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मग निर्णय घ्या,” असे त्या म्हणाल्या. तसेच, इतरांच्या बोलण्यामुळे किंवा वर्तनामुळे स्वतःला दुःखी न होऊ देणे, ‘लेट गो’ची वृत्ती अंगीकारणे आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग हा केवळ व्यायाम नसून तो मनोविज्ञानाशी संबंधित विषय आहे, जो योग्य विचारसरणी विकसित करण्यास मदत करतो. तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचा अवलंब करावा, असेही संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजे

 योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजे, असे सांगत संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी काम करतानाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. काम महत्त्वाचे आहे, पण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवूनच काम करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

 

मानसिक तणाव आणि नकारात्मक विचार यांचा शरीरावर मोठा परिणाम होतो, असे सांगताना त्यांनी नमूद केले की, सुमारे ७० टक्के आजारांचे मूळ कारण चुकीची जीवनशैली आणि मानसिक असंतुलन आहे. त्यामुळे आत्मजाणीव आणि आत्मस्नेह या योगातील मूलभूत तत्त्वांचे पालन आवश्यक असल्याचे संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi