एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा
- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ६ :- मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्री नितेश राणे म्हणाले, मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, जेणेकरून सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने राबविता येईल, असेही ते म्हणाले.
जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी, अशा सूचना मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.
जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली
No comments:
Post a Comment