Thursday, 8 February 2024

‘महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

 ‘महाप्रित’ च्या विशेष कार्य अधिकारी पदी

बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

 

 

            मुंबई, ‍‍दि. ८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            श्री. श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित" (महाप्रित)" या नावाची सहयोगी उप कंपनीची, कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत स्थापन झाली.  महाप्रित या उप कंपनीमार्फत बदलत्या काळाची गरज, मागास व दुर्बल समाजाच्या गरजा व वाढत्या आकांक्षा लक्षात घेऊन, केंद्र व राज्य शासनाची विविध उद्दिष्टे, योजना व उपाय योजना एकत्रित करुन मागासवर्गीय समाजाच्या सर्व समावेशक विकासासाठी ‘नवयुग योजना’ आखली आहे. या उपकंपनीच्या सहभागाने शासन ते शासन (Govt. to Govt.) प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत महाप्रित या उप कंपनीमार्फत ठाणे महानगर पालिका क्षेत्रात (टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर) एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत समूह विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  राज्यभरात इतर अनेक महत्वपूर्ण प्रकल्प ‘महाप्रित’ मार्फत राबविण्यात येणार आहेत.

0000

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक

पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

            - पालकमंत्री संजय राठोड

            मुंबई, ‍‍दि. ८ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या बसस्थानकाची पुनर्बांधणीची कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

            मंत्रालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रलंबित विषयाबाबत बैठक झाली.

             पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले की, दिग्रस आणि दारव्हा येथील अत्याधुनिक बसस्थानकांमुळे नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार आहे. या बसस्थानकातील विद्युत व्यवस्था, पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरण, वाहनचालक विश्रांतीगृह या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी दिल्या.

            एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत, बसस्थानक निधी, जादा बसेस मिळणे या विषयाबाबतही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.

                या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव श्री. होळकर, परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक श्री.बरसट तसेच परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी

कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 

            मुंबई, दि. ८ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 (73 मृत्यू व 4 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 1 कोटी 51 लाख रुपयाचा विमा वितरित  करण्यात येणार आहे .

            तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 (237 मृत्यू व 2 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 4 कोटी 76 लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील 2137 (2094 मृत्यू व 43 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 42 कोटी 36 लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची 47 कोटी 12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.

            अशा प्रकारे राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 दावे  निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

0000

बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत

 बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत

सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत

                                                   - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

               मुंबई, दि. 8 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेवून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

            या समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेस प्रत्यक्ष भेट देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल आवश्यक कागदपत्रांसह त्वरित सादर करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी  दिल्या आहेत.

             डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अध्यक्ष, डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. शंकरराव चव्हाण, सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड,सदस्य  डॉ. सुनिल लिलानी, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे सदस्य श्री. समाधान जामकर, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई  हे समितीचे सदस्य आहेत.

0000

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी

विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 

            मुंबई, दि. ८ : सांगली  जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

            सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे नव्याने निर्मित केलेल्या विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

            मुंबई, दि. ८ : सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी 4 फेब्रुवारीपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

            सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे.

०००

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील पात्र उमेदवारांना आवाहन

 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील

पात्र उमेदवारांना आवाहन

 

            मुंबई, दि. ८ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे विभागांतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सहकार आयुक्त यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेले  उमेदवार व्यावसायिक चाचणी परीक्षा कोणत्या माध्यमातून (मराठी/इंग्रजी) देणार आहेत, याबाबतचा तपशील भरण्यासाठी दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी लॉगिन करून, टॅब्स ओपन करुन व्यावसायिक परीक्षेचे भाषा माध्यम नोंदवावे, असे आवहान योगीराज सुर्वे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/


 


Featured post

Lakshvedhi