Thursday, 19 November 2026

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार

 राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या

निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत जलयुक्त शिवार ३.० ची १८ हजार गावांत अंमलबजावणी

 

मुंबई, दि. १९ : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य शासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाच्या जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि निश्चित उद्दिष्टानुसार काम करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जलशक्ती अभियान (जलसंचय: जनभागिदारी 3.0) राबविण्याबाबत बैठक झाली या बैठकीस वर्षा या शासकीय निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. बैठकीस पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी सहभागी झाले होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील जवळपास ९० टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यावर विशेष भर देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi