Thursday, 15 October 2026

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू २०२७-२८ पासून नर्सरीसाठी तीन वर्षे २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक ,pl share

 शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू

  • २०२७-२८ पासून नर्सरीसाठी तीन वर्षे
  • २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक

 

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. हे वय ३० जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असून, नवीन निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

 

या निर्णयानुसार बालवाटिका-१ अथवा नर्सरीच्या प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होईल. बालवाटिका-२ अथवा ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२८-२९ पासून, बालवाटिका-३ अथवा सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०२९-३० पासून, तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष २०३०-३१ पासून लागू होईल.

 

राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या दिनांकांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती. तसेच पूर्व-प्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठी निश्चित वयाची अट अस्तित्वात नव्हती. केंद्र शासनाने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे कळविले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने हे वयाचे निकष निश्चित केले आहेत.

 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनाही पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

 

पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देता येईल. पायाभूत वर्गांतील नामांकन आणि नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील सूचनांचे पालन करावे लागेल.

 

नवीन वयोमर्यादेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi